कंग्राळी खुर्द गावातील आदरणीय व्यापारी आणि किराणा दुकानदार कैलासवासी शंकर भैरू चव्हाण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी (28 सप्टेंबर 2024) दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रद्धांजली कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. गावातील विठ्ठल–रुक्मिणी महिला भजनी मंडळाने “बाबा तुझे उपकार किती आठवू”, “देवा तुझे दारी उभा क्षणभरी” यांसारखी भावस्पर्शी भजने सादर करत वातावरण भक्तिमय केले.
परमपूज्य आई कलावती मातेकडून भक्तीचा वारसा घेऊन शंकर चव्हाण यांनी 1991 साली ज्ञानेश्वरी पारायण मंडळाला ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती भेट दिली होती. या उपक्रमातून गावात वारकरी संप्रदायाची गोड परंपरा रुजली. हरिपाठ–पारायणाची गोडी लागून व्यसनमुक्तीचा संदेश पसरविण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. आजही गावातील असंख्य वारकरी त्यांना आदरपूर्वक स्मरतात.
त्यांची मुलगी अंजना व मुलगा किसन हे सदगुरू आई कलावतीमातांच्या कृपेने पेटी व तबला वाजवत संगीताचा वारसा पुढे नेत आहेत. ग्राहकांशी नेहमी प्रेमाने बोलणे, जुन्या वर्तमानपत्राचा वापर करून झटपट एक किलोचा पुडा बांधण्याचे कौशल्य यामुळे शंकर चव्हाण ग्राहकांच्या मनात कायमचे घर करून गेले.
कार्यक्रमात शिक्षिका शारदा सावंत व वाय. बी. पवार सरांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तर सौ. कमल कंग्राळकर यांनी भावनिक ओळींमधून त्यांच्या स्मृतींना शब्दबद्ध श्रद्धांजली वाहिली –
“दिवसा मागुणी दिवस गेले, आज एक वर्ष ही सरले…
ठेवीतो शिरीष पायावरी म्हणून कृष्णारती,
वाहतो स्वरांजली, हीच तुम्हा श्रद्धांजली….”

