ऐन सणादिवशी बेळगावात जोरदार पाऊस; बाजारपेठांत पाणीच पाणी

बेळगाव : ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालक, व्यापारी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून अचानक झालेल्या मुसळधार पावसाचा थेट फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. विशेषतः काजू व आंब्याच्या बागांमध्ये मोर (फळधारणा होण्याआधीची अवस्था) गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेवर पाऊस थांबला नाही, तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
