Spread the love

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावात दुर्दैवी घटना घडली असून गर्लगुंजी गावचे सुपुत्र व गर्लगुंजी पी.के.पी.एस. सोसायटीचे मॅनेजर सातेरी मल्लाप्पा बिर्जे यांचे जेष्ठ सुपुत्र विशाल सातेरी बिर्जे (वय २५) यांचे रविवारी दुपारी सुमारे १ वाजता आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रंगपंचमी निमित्त मित्रांसोबत रंग खेळल्यानंतर विशाल बिर्जे हा मित्रांसह खानापूर येथील मलप्रभा नदीतील रामघाट येथे आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करत असताना पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. त्याला साधारण पोहता येत असल्याचे सांगितले जात असले तरी अचानक घडलेल्या प्रसंगामुळे मित्रांनी त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक आणि आपत्कालीन सरकारी पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ शोधमोहीम राबविल्यानंतर पाताळगड्डीच्या सहाय्याने पाण्यात शोध घेत असताना विशालच्या हाताला बांधलेल्या दोरीला मृतदेह अडकलेला आढळून आला. त्यानंतर पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले.
विशाल बिर्जे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने बिर्जे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गर्लगुंजी गावात शोककळा पसरली आहे.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ७ वाजता गर्लगुंजी स्मशानभूमीत होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.