कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने २०२६ च्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत ऐतिहासिक सुधारणा झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्याचा एकूण निकाल ८६.४८ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या ७३.४५ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल १३.०३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
जिल्हानिहाय क्रमवारीत यंदाही किनारी जिल्ह्यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. उडुपी जिल्ह्याने ९६.३९ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले, तर दक्षिण कन्नड ९६.३५ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
बेळगाव जिल्ह्यासाठी हा निकाल अभिमानास्पद ठरला आहे. गोगटे वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने ६०० पैकी ५९९ गुण मिळवत वाणिज्य शाखेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच गोकाकच्या सी.एस.ए. कॉलेजची दिव्यप्रभा मणिवन्नन हिने ५९७ गुणांसह विशेष प्राविण्य मिळवले.
विज्ञान शाखेत निदसोशी येथील अंकित भीमप्पा करातगी याने ५९८ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. कला शाखेत अथणीच्या शिवानंद बुरलट्टीने ५९५ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. लिंगराज कॉलेजची सृष्टी सोलोनी (५९४) आणि अश्विनी सिंगोटी (५९३) यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत टॉपर्समध्ये स्थान मिळवले.
बेळगाव जिल्ह्याचा एकूण निकाल ८०.३२ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या ६५.३७ टक्क्यांच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, विजापूर जिल्ह्याने सर्वाधिक झेप घेत ५८.८१ टक्क्यांवरून थेट ९२ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. उत्तर कन्नड (९१.७८%), बेंगळुरू ग्रामीण (९१.००%) आणि चिक्कबल्लापुरा (९०.२४%) या जिल्ह्यांनीही ९० टक्क्यांहून अधिक निकाल नोंदवत आघाडी घेतली आहे.
शिक्षण विभागाने या यशाबद्दल समाधान व्यक्त केले असून, विशेषतः ग्रामीण भागातील व मोरारजी देसाईसारख्या सरकारी संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यादगिरी जिल्हा ७१.२१ टक्क्यांसह तळाशी असला तरी, त्यानेही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी सुधारणा दर्शवली आहे.
या निकालामुळे यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि पालकांचेही सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

कर्नाटक बारावी निकालात ऐतिहासिक झेप; राज्याचा निकाल ८६.४८% – बेळगावच्या विद्यार्थ्यांचा दमदार ठसा
Related Posts
जी एस एस पी यु काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावी वार्षिक परीक्षेत घवघवीत यश
Spread the loveजी एस एस पी यु काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावी वार्षिक परीक्षेत घवघवीत यश सालाबादप्रमाणे या वर्षी ही जी एस एस पी यु काॅलेजचे विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने वार्षिक परीक्षेस सामोरी…
रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Spread the love रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव सीमावादाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला…
