Spread the love
  • बेळगावजवळील जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी एका तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
    राहुल तिप्पाण्णा तळवार (वय 23, रा. तानाजी गल्ली, मजगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. राहुल हा बेळगावातील एका औषध दुकानात काम करत होता.
    मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे 5.15 वाजण्याच्या सुमारास राहुलला रामेश्वरनगर परिसरात बोलावण्यात आले होते. आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून काही जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला.
    घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी तसेच एसीपी गंगाधर बी. एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.
    या प्रकरणात आठ ते दहा जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
    दरम्यान, गुरुवारी सकाळी राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी रुग्णालय परिसराला भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
    मृत राहुलच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे मजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.