बेळगाव :
गोव्याला जात असलेल्या चिन्नाभूषण (सोन्याचे दागिने) तयार करणाऱ्या कामगारांचे अपहरण करून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 40.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणी पश्चिम बंगालमधील मूळ रहिवासी व सध्या शहापूर येथे वास्तव्यास असलेले एस. के. इबादुल यांनी तक्रार दाखल केली होती. इबादुल हे त्यांचे मित्र रबियुल गाझी आणि अली हुसेन मंडल यांच्यासह कारने गोव्याकडे जात असताना खानापूर तालुक्यातील उचवडे गावाजवळील बैलूर क्रॉस परिसरात राष्ट्रीय महामार्ग 748 वर काही अज्ञातांनी त्यांची कार अडवली.
दरोडेखोरांनी तिघांना जबरदस्तीने रस्त्यालगतच्या शेतात नेऊन पिस्तूल व चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर इबादुल यांच्याकडील 1,00,200 रुपये रोख आणि रबियुल गाझी यांच्याकडील 225 ग्रॅम सोने लुटून आरोपी फरार झाले होते.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. फिर्यादीचे मित्र असलेले रबियुल गाझी आणि अली हुसेन मंडल यांनीच या दरोड्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी शहापूर येथील सादिक तोरगळ याच्यासोबत मिळून दरोड्याचे षड्यंत्र आखले होते. यासाठी विवेक चंद्रकांत पाटील याला 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात उघड झाले.
सुपारी स्वीकारल्यानंतर विवेक पाटील याने आपल्या चार साथीदारांसह दरोड्याची घटना घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
रचियुल रुहुल अमीन गाझी (29), अली हुसेन कविरुद्दीन मंडल (27), सादिक अब्दुल रहमान तोरगळ (37), विवेक चंद्रकांत पाटील (33), प्रशांत महादेव चव्हाण (37), नितीन राजाराम चव्हाण (36), दिगंबर नागेश पाटील (26) आणि मयूर राजू घाडी (26).
पोलिसांनी आरोपींकडून सुजुकी ब्रेझा कार, एर्टिगा कार, आणखी एक कार, 1,00,200 रुपये रोख, देशी बनावटीचे पिस्तूल, चाकू, आठ मोबाईल फोन, एक दुचाकी आणि 205 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे बिस्किट असा एकूण 40,50,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
