बेळगाव, ३० मे : खानापूर तालुक्यातील काटगा
ळी गावात सुरू असलेल्या अवैध देशी पिस्तूल (कंट्री गन) निर्मिती आणि विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात खानापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी १३ आरोपींना अटक करून ९ देशी पिस्तुले, ४८ जिवंत काडतुसे, दारुगोळा तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कटगळी गावात अवैधरित्या देशी पिस्तुले तयार करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. तपासादरम्यान मारीती श्रीकांत सुतार हा २०२४ पासून स्वतःच्या घरात देशी पिस्तुले तयार करून विविध व्यक्तींना विकत असल्याचे उघड झाले.
११ मे रोजी मुख्य आरोपी मारीती सुतार याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तयार करण्याच्या प्रक्रियेत असलेले एक देशी पिस्तूल जप्त करण्यात आले. पुढील तपासात त्याच्याकडून पिस्तुले खरेदी करणाऱ्या अनेक जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी ८ देशी पिस्तुले जप्त करण्यात आली.
तपासात उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील रामनगर येथे पुस्तक विक्रीच्या आडून बंदुकीचे सुटे भाग आणि दारुगोळा विक्री करणारा आरोपीही समोर आला. त्याच्याकडून २१ गन पार्ट्स, १५ निपल्स, ५ हेड्स, ३४ दारुगोळ्याची पाकिटे, ४४९ शिशाच्या गोळ्या, ४२० कॅप्स आणि ४८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
याशिवाय, बेळगावमधील एका गन शॉपचा परवाना २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतरही तेथील उरलेला दारुगोळा आणि सुटे भाग बेकायदेशीरपणे विक्री केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित दुकान मालकालाही अटक करण्यात आली आहे.
तसेच, बेळगाव तालुक्यातील देसूर येथे देशी पिस्तुलांच्या बॅरलला वेल्डिंग करून देणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडील वेल्डिंग मशीन जप्त करण्यात आले आहे.
सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रनिर्मिती आणि विक्रीच्या जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, बैलहोंगल उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात खानापूर पोलीस निरीक्षक एल.एच. गौंडी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यातील अवैध शस्त्रजाळ्यावर घाव घालणाऱ्या पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
खानापूर तालुक्यात अवैधरित्या देशी बंदुका तयार करून विकणारे जाळे गजाआड ; १३ जण अटकेत*
Related Posts
कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन
Spread the loveकन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे…
*गोव्याला जाणाऱ्या सुवर्णकार कामगारांच्या दरोड्याचा पर्दाफाश; आठ जण अटकेत, 40.50 लाखांचा मुद्देमाल जप्त*
Spread the loveबेळगाव : गोव्याला जात असलेल्या चिन्नाभूषण (सोन्याचे दागिने) तयार करणाऱ्या कामगारांचे अपहरण करून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे…
