कापिलेश्वर गणेशोत्सव चौकात वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत आरती

बेळगाव, 29 ऑगस्ट :
कापिलेश्वर गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सामाजिक बांधिलकी जपत कापिलेश्वर गणेशोत्सव चौक समितीने शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना विशेष आमंत्रण देऊन गणेश आरतीत सहभागी करून घेतले. श्रद्धा व आनंदाने भारलेल्या वातावरणात ज्येष्ठ नागरिकांनी बाप्पाचे दर्शन घेतले व आरती अर्पण केली.
या प्रसंगी समाजसेवक विजय मोरे यांनी गणेशोत्सव काळात सलग 11 दिवस विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यांनी व संजय वळवलकर यांनी शहरातील इतर गणेश मंडळांनाही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले. “धार्मिक उत्सव सामाजिक जबाबदारीशी जोडले गेले तर समाजात सकारात्मकता व ऐक्य वाढते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
आरतीनंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांना कापिलेश्वर दक्षिण काशी येथे दर्शन घडवण्यात आले. त्यानंतर प्रेमाने स्वादिष्ट भोजन देण्यात आले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या उपस्थितीमुळे गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण झाला.
या कार्यक्रमाला कापिल भोसले, पप्पू लगडे, ऍलन विजय मोरे, दीपक जाधव, अशोक जाधव, संजय वळवलकर, विनायक जाधव, राहुल पाटील, आकाश हुलियार, संतोष देवर, यशवंत राजपूत, श्री जाधव, अरविंद देवर, सुधीर यादव व अरुण कुलाल आदी मान्यवर उपस्थित होते.
