Spread the love

बेळगाव:

पुन्हा सुरु झाला आरोप प्रत्यारोप संघर्षाचा !

माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील टॉकवॉर पुन्हा एकदा सुरु झाले असून लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच बेळगावमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र कोणत्या कारणामुळे पराभव झाला याची कारणमीमांसा शोधण्यात येत आहे. जय आणि पराजय या दोन्ही गोष्टी आम्ही समानतेने स्वीकारल्या आहेत. यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आपले बंधू अधिक मतांनी विजयी झाले.

मागील विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्याचा प्रयत्न करूनही माझ्या मतदार संघातील जनतेने मला बहुमतांनी विजयी केले. लोकसभा निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव झाला. मात्र जिथून आपण पराभूत झालो तिथूनच पुन्हा एकदा विजयी होण्याचा निर्धार माझ्या मुलाने केला असून यासाठीच संघटितपणे आम्ही फिरत असल्याचे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या.
मागील निवडणुकीत रमेश जारकीहोळी यांनी, लक्ष्मी हेब्बाळकर विजयी झाल्या तर आपण त्यांना हार घालू असे वक्तव्य केले होते. तो हार कुठे आहे? असा सवाल हेब्बाळकरांनी उपस्थित केला. त्यांची संस्कृती कशी आहे हे राज्यातील जनतेला माहीत आहे. राज्यातील जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असे त्या म्हणाल्या.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या सुशासन दिले आहे. दिलेल्या वचनाप्रमाणे ते सरकार चालवत आहेत. अनेक लोकप्रिय प्रकल्प राबविण्यात येत आहेत. काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांचे मत घेऊनच हायकमांडने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे.
कोविड काळात उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात सेवा दिली आहे. सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार हे काँग्रेसचे दोन डोळे असून काहीही झाले तरी हायकमांडचा निर्णयच अंतिम राहील, अशी प्रतिकिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.