Spread the love

बेळगाव:

पर्यटनासाठी आंबोलीला जाणार असाल तर सावधान…! कारण तुमच्या खिशाला आर्थिक दंडाचा फटका बसू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा व घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे आणि अतिउत्साही पर्यटकांना चाप लावणे या उद्देशाने वन विभागाने आंबोलीत अनेक निर्बंध लागू केले आहेत.
आंबोली घाट व धबधबा परिसर राखीव संवर्धन क्षेत्रात येते. त्यामुळे तेथे कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे यासारख्या निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचपथदर्शी निर्णय वन विभागाने घेतला आहे.

ज्यामध्ये कचरा करणे, वन्यप्राणी माकड यांना खाऊ घालणे/छेडछाड करणे, मद्यपान करणे/ मद्य बाळगणे यामधील प्रत्येक कृत्यासाठी ₹ 1000 रुपये तर धूम्रपान करताना आढळल्यास ₹ 500 रु. दंड आकारण्यात येणार आहे. हाच प्रमाद दुसऱ्या वेळेला केल्यास संबंधित पर्यटकांवर वन कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविला जाणार आहे. दरम्यान, याअंतर्गत 15 व 17 जून या दोन दिवसांत 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून 11,500 रुपयांचा दंड वसूल करून तो शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. कारवाई झालेल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या 2 व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, मद्यपान करणाऱ्या 2 व्यक्ती आणि माकडांना खाऊ घालणाऱ्या 6 व्यक्तींचा समावेश होता. त्यामुळे आता पर्यटकांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे.गोवा सरकारनेही सर्व धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली होती. त्यानंतर कमी जोखमीचे 14 धबधबे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. असे असले तरी बंदी असो वा नसो, सिंधुदुर्गातील आंबोली आणि मांगेली येथील धबधब्यावर जाणाऱ्यांमध्ये पर्यटकांची संख्या मोठी असते. पण यावर्षीपासून सिंधुदुर्ग वन विभागाने अनेक निर्बंध लागू केल्याने पर्यटकांना सावधपणे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटावा लागेल.
आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधता टिकविण्यासाठी मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधि करून उपस्थित वन अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. कोकणचे वैभव असलेल्या आंबोली घाटाचे संवर्धन व संरक्षण करण्यात यावे असे आव्हान केले जात आहे.