Spread the love

बेळगाव:

कोणाला किती मतदान?, कोण होणार विजयी ? पण मतदान बंद मशीन मध्ये झाले , असंख्य तर्क वितरक चर्चेला मात्र झाली सुरुवात, त्याआधी जाणून घेऊया सध्याचा मतदानाचा आकडा, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत शांततेने पार पडली. यावेळी बेळगाव लोकसभा मतदार संघात मध्ये 71. 38 टक्के तर चिक्कोडीमध्ये 78.52 टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे.

बेळगाव लोकसभा मतदार संघामध्ये आज सकाळी प्रारंभी धीम्या गतीने मतदान सुरू होते. मात्र त्यानंतर अल्पावधीत मतदारांचा ओघ वाढवून सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. तथापि त्यानंतर मतदारांची संख्या कमी होऊन बहुतांश मतदान केंद्रे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. उन्हाचा तडाखा काहीसा कमी होताच पुन्हा सायंकाळी 4 नंतर मतदानाचा वेग वाढला होता बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये सौंदत्ती आणि बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सर्वाधिक मतदान झाले. जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार असिफ (राजू) सेठ, काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील आदींनी आज सकाळच्या सत्रात आपला मतदानाचा हक्क बजावला. हुबळीला जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावून परतलेले बेळगाव मतदार संघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर सर्वत्र फिरवून मतदान प्रक्रियेची पाहणी करताना दिसत होते.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान
बेळगाव ग्रामीण 76. 87%
सौंदत्ती 76.73%
रामदुर्ग 73.6%
बैलहोंगल 73.5%
अरभावी 71.92%
गोकाक 71.06%
बेळगाव दक्षिण 66.52%
बेळगाव उत्तर 63.62% यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमधील बेळगावातील मतदानाची एकूण सरासरी टक्केवारी अनुक्रमे 2004 मध्ये 66.10 टक्के, 2009 मध्ये 54.75 टक्के, 2014 मध्ये 68.25 टक्के, 2019 मध्ये 66.59 टक्के आणि 2021 मध्ये 56.02 टक्के इतकी होती. या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा साडेतीन टक्के मतदानात वाढ झाली आहे .
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आठ पैकी पाच मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस बळकट असलेल्या बेळगाव ग्रामीण आणि सौंदत्ती या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले तर भाजप बळकट असलेल्या बेळगाव दक्षिण अरभावी आणि गोकाक मध्ये सरासरी पेक्षा कमी मतदान झाले आहे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपला याविषयी औत्सुक्य निर्माण झाली आहे