- राजा शिवछत्रपती चौक ते मरिअम्मा मंदिर पर्यंतचा रस्ता आराखड्यानुसार करा; अन्यथा माजी नगरसेवक व पत्रकारांचा, अमरण उपोषणाचा इशारा

खानापूर : खानापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला राजा शिवछत्रपती चौक ते मरिअम्मा मंदिर दरम्यानचा रस्ता आराखड्यानुसार करण्यात यावा, यासाठी काही दुकानांमुळे व बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप पत्रकार व माजी नगरसेवक दिनकर परशराम मरगाळे व विवेक रामचंद्र गिरी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी नगरपंचायत खानापूरचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तक्रारदार दिनकर परशराम मरगाळे व विवेक रामचंद्र गिरी हे दोघेही यापूर्वी नगरपंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते. सध्या खानापूर शहर अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून, राजा शिवछत्रपती चौक ते मरिअम्मा मंदिर (हलकर्णी क्रॉस) पर्यंतचा रस्ता मंजूर आराखड्यानुसार होणे अत्यावश्यक आहे. मात्र या मार्गावर असलेली काही दुकाने व बेकायदेशीर अतिक्रमणे रस्त्याच्या कामात अडथळा ठरत आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर अडथळे हटवण्यासाठी आजपर्यंत दोन वेळा नगरपंचायतीस नोटिसा दिल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. मुख्याधिकारी हे संबंधित ठेकेदार, दुकानदार व बेकायदेशीर अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, चार दिवसांच्या आत सदर अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा चार दिवसांनंतर नगरपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तसेच, या आंदोलनादरम्यान आमच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायतीचे प्रशासक व खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार, मुख्याधिकारी संतोष कुरबेट तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर राहील, अशी स्पष्ट नोंद घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, बेळगाव, जिल्हा पोलीस प्रमुख बेळगाव. नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी व खानापूरचे तहसीलदार. तसेच पोलीस निरीक्षक, खानापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.
या निवेदनामुळे खानापूर नगरपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून, येत्या चार दिवसांत प्रशासन काय भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
