Spread the love

अथणी (जि. बेळगाव) येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट भूमिका मांडताना, काँग्रेसमध्ये गेलेले आमदार लक्ष्मण सवदी यांना पुन्हा भाजपमध्ये स्थान नसल्याचे ठामपणे सांगितले. “सवदी कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये येणार नाहीत, आणि आलेच तर पक्षात त्यांना स्थान दिले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अथणी मतदारसंघात सवदी यांच्या पुनरागमनाबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी केवळ अफवा ठरवत, भाजप कार्यकर्त्यांना अशा चर्चांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी काहीजण मुद्दाम अशा अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी 2028 च्या निवडणुकांकडे लक्ष वेधत, भाजप कार्यकर्त्यांनी आतापासूनच संघटितपणे कामाला लागण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी करणे हेच एकमेव ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.