बेळगावात मराठी समाजावर पुन्हा ताण निर्माण झाला आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याने दोन दिवसांपूर्वी मराठी भाषिकांविरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याने मराठी जनतेत तीव्र संताप उसळला आहे.
या वक्तव्याचा निषेध करत युवा समितीचे सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांनी समाजमाध्यमांवरून नारायण गौडाला प्रत्युत्तर देत, “जशास तसे उत्तर दिले जाईल” असे ठाम विधान केले.
या पोस्टच्या पार्श्वभूमीवर माळमारुती पोलीस ठाण्यात शुभम शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात आज सकाळी त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले असून, सध्या पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाही. दरम्यान, मराठी समाजात या कारवाईविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, मराठी कार्यकर्त्यांनी “हा मराठी आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे” असा आरोप केला आहे.
या घटनेच्या पुढील तपासावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
