Spread the love


बेळगाव : भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान अत्यंत महान व महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक, राजकीय आणि कायदा क्षेत्रात त्यांनी मोठे परिवर्तन घडवून आणले असल्याचे मत बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी व्यक्त केले.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि वार्ता व सार्वजनिक संपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ७ मार्च) डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भीमगायन’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाबासाहेब आंबेडकर बेळगावला भेट दिली असताना कंग्राळ गल्लीतील एका घरात त्यांनी मुक्काम केला होता. त्या घराचा विकास करण्यात येणार असून आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे आमदार सेठ यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बेळगाव जिल्ह्याला अनेक वेळा भेट दिली असून त्या भेटींमुळे दलित समाजाच्या हक्कांबाबत, शिक्षणाबाबत आणि सामाजिक जागृतीसाठी मोठी प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात वार्ता व सार्वजनिक संपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी शिक्षणामुळेच समाजात परिवर्तन शक्य असल्याचे सांगितले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिका उपआयुक्त उदयकुमार तळवार यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.
यानंतर सिद्धार्थ युवा क्रीडा सांस्कृतिक विकास संघाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘भीमगायन’ संगीत कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, समतेसाठीचा संघर्ष, अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश गीतांच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा परिषद उपसचिव बसवराज हेग्गनायक, समाज कल्याण विभागाचे संयुक्त संचालक रामनगौडा कन्नोळी, जिल्हा कर्मचारी संघाचे अध्यक्ष बसवराज रायव्वगोल तसेच विविध दलित संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.