Spread the love

बेळगाव : कर्नाटक राज्य वकील परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्यभरात मोठी चुरस निर्माण झाली असून मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत राज्यभरातून एकूण १४९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राज्यातील एकूण ७० हजार ४४ वकील मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बेळगाव शहर व तालुक्यातील २१६० वकील मतदार असून बेळगावमधून आठ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राज्यभरातील या निवडणुकीत एकूण २५ सदस्यांची कमिटी निवडली जाणार असून त्यापैकी २ सदस्यांची नियुक्ती सरकारमार्फत केली जाणार आहे.
या निवडणुकीत प्रथमच महिलांसाठी सात जागा राखीव ठेवण्यात आल्या असून त्यापैकी पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे महिला उमेदवारांमध्येही उत्सुकता आणि चुरस वाढली आहे.
बेळगाव न्यायालय परिसरातही मतदान प्रक्रिया सुरू असून वकिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याची माहिती बेळगाव बार असोसिएशनचे माजी प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी दिली.