वारकऱ्यांनी आता पंढरीहून परतीचा मार्ग धरला असून अशातच मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं खळबळ उडाली असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत.
सीमाभागातील तुरमुरी या गावातील वारकरी पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी गेले होते. यानंतर ते नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून बेळगावकडे जात असताना रस्ता चुकल्याने ते सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगाव या गावात गेले. या ठिकाणी अरुंद रस्त्यावरून ट्रक नेत असताना एका कारचालकासोबत वारकऱ्यांचा वाद झाला.
यानंतर गावातील काही ग्रामस्थांनी आणि एका सराईत गुन्हेगाराने बेळगावमधील वारकऱ्यांचा ट्रक अडवला. त्यानंतर वारकऱ्यांना कुऱ्हाडीचा दांडा आणि काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुरेश खेमनना राजूकर, परशुराम खाचो जाधव आणि ट्रक चालक असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी परशुराम जाधव हे बेशुद्ध अवस्थेत असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
वारकऱ्यांना मारहाण केल्यानंतर मालगावमधील संबंधित ग्रामस्थांनी घटनास्थळावरून पलायन केले. वारकऱ्यांना झालेल्या मारहाणीबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांना अनुदान देण्याऐवजी महाराष्ट्रात वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा द्यावी, असे मत वारकऱ्यांना सुरक्षा द्यावी असे मत बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या गावातील वारकऱ्यांनी व्यक्त केले.
आषाढी वारी करून हे भाविक गुरुवारी ट्रकमधून गावी परत जात होते. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरून ट्रक मिरजेकडे जाण्याऐवजी मालगावच्या दिशेने गेला. मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे एक चारचाकी वाहन रस्त्यात उभे केले होते. त्यामुळे ट्रक पुढे जाऊ शकत नव्हता. ट्रकचालक व वारकऱ्यांनी चारचाकी वाहन काढण्याची विनंती वाहन चालकाला केली. त्यातून ट्रकचालक श्रीकांत मनवाडकर यांच्यासोबत काही जणांचा वाद झाला.
त्यातूनच मनवाडकर यांना जमावाने बेदम मारहाण केली. मालगावातील एका सराईत गुन्हेगारासह सुमारे वीस जणांच्या जमावाने ट्रक रोखून वारकऱ्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वारकऱ्यांत हलकल्लोळ उडाला. ट्रकमधील वृद्ध व महिला वारकरी, बालके भयभीत झाले होते. ट्रक चालक मनवाडकर यांना कुऱ्हाडीचा दांडा व ट्रकवरील झेंड्याची काठी काढून बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना वाचविण्यासाठी आलेले वारकरी परशुराम जाधव व तुरमुरीचे ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूरकर यांना देखील जमावाने बेदम मारहाण केली. जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.