Spread the love

अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या राजहंसगड परिसरातील भंगी रस्त्यांच्या कामांना अखेर गती मिळाली असून, सध्या सुमारे १ कोटी १० लाख रुपयांच्या निधीतून विविध रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून हा विकास आराखडा राबवण्यात येत आहे.
राजहंसगड गाव दत्तक घेतल्यानंतर मंत्री हेब्बाळकर यांनी आपल्या निधीतून पायाभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांची मालिका सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या भंगी रस्त्यांच्या कामांना आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खुदाई कामकाजाला प्रारंभ करण्यात आला.
सध्या महादेव गल्ली–मारुती गल्ली पाठीमागील रस्ता, मारुती गल्ली–सिद्धकला गल्ली पाठीमागील रस्ता, सिद्धकला–कामत गल्ली पाठीमागील रस्ता, हनुमान गल्ली–रायगड गल्ली पाठीमागील रस्ता तसेच शिवाजी गल्ली भंगी रोड या प्रमुख मार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या कामाच्या प्रारंभप्रसंगी माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे, तसेच सिद्धाप्पा पवार, शिपया भुलकट्टी, शिवाजी बस्तवाडकर, सिद्धाप्पा नाईक, बाळू गुरव, परशु वालेकर, नारायण हावळ, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सिद्धाप्पा छत्रे हे स्वतः लक्ष घालून सर्वांना एकत्रित करत विकासकामांना चालना देत आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा हात मजबूत करण्यासाठी गावकऱ्यांनीही सहकार्याचा हात पुढे केला आहे.
“राजहंसगड आणि विकास” हा मंत्र जपणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कामाचे सध्या ग्रामस्थांकडून कौतुक केले जात असून, या कामांमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.