- फिट इंडिया अॅम्बेसेडर आणि भारत सरकारचे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजितसिंग राजपूत यांनी आज शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट देत तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधला. या भेटीत त्यांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत वेळ घालवून त्यांच्या आनंदात सहभागी होत विशेष समाधान व्यक्त केले.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी असल्याचे पाहून राजपूत यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आश्रमातील स्वच्छ, शांत आणि प्रसन्न वातावरणाचे त्यांनी विशेष कौतुक करत, ही सेवा आणि व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले.
यावेळी माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शांताई वृद्धाश्रम अधिक उत्तम आणि सुविधायुक्त बनवण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे राजपूत यांनी कौतुक केले. समाजसेवेतील त्यांची दृष्टी आणि समर्पण भावनेचा त्यांनी गौरव केला.
या प्रसंगी शांताई वृद्धाश्रमाचे संचालक मंडळाचे सदस्य अॅलन विजय मोरे यांनी रणजितसिंग राजपूत यांचा शाल, आश्रमाचे पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
कार्यक्रमादरम्यान प्रदीप पुनेकर आणि विजय मोरे यांनी रणजितसिंग राजपूत यांनी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीमुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे त्यांनी सांगितले.
ही भेट अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून, या संवादातून उपस्थित सर्वांनाच प्रेरणा आणि आनंद मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


