बेळगाव : भगवान महावीर जयंती निमित्त सरकारने सोमवार दि. 30 मार्च रोजी सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी होणारी एसएसएलसी अर्थात इयत्ता दहावीची तृतीय विषयाची परीक्षा मंगळवार दि. 31 मार्च रोजी घेतली जाणार असल्याचे कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळांने जाहीर केले आहे.
कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने 2026 च्या एसएसएलसी परीक्षा-1 संदर्भात महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आधीच निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. 18 मार्चपासून सदर परीक्षेला प्रारंभ झाला असून दि. 2 एप्रिल 2026 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. मात्र आता महावीर जयंतीच्या सार्वजनिक सुट्टीमुळे एका पेपरच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मंडळाने गेल्या दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी एसएसएलसी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले होते. त्या वेळापत्रकानुसार तृतीय भाषा विषयाची परीक्षा दि. 30 मार्च 2026 रोजी होणार होती. तथापि राज्य सरकारने दि. 26 मार्च 2026 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार महावीर जयंतीची सार्वजनिक सुट्टी दि. 31 ऐवजी दि. 30 मार्च रोजी घोषित करण्यात आली आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये यासाठी मंडळाने तातडीने निर्णय घेत तृतीय भाषा विषयाची परीक्षा दि. 30 ऐवजी दि.श31 मार्च रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या बदलामुळे केवळ तृतीय भाषा विषयाच्या परीक्षेची तारीख बदलण्यात आली असून उर्वरित सर्व विषयांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. तसेच बदललेली परीक्षा देखील आधीच ठरलेल्या वेळेतच घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
