Spread the love

बेळगाव : महाजन अहवाल आणि त्यावर आधारित ठरावाच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, यावर राष्ट्रीय पक्षांतील मराठी नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी शुभम शेळके यांनी केली आहे.
शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना महाजन ठरावावर तीव्र नाराजी व्यक्त करत, हा ठराव म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला. मराठी भाषिकांच्या भावनांना डावलून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेस व भाजपमधील मराठी नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला.
“महापालिकेत मराठी प्रश्नावर ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठी अस्मितेवर कुठलाही घाव सहन केला जाणार नाही,” असा इशारा शेळके यांनी दिला. तसेच, 58 पैकी 55 नगरसेवकांनी ठरावाला समर्थन दिल्याच्या दाव्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मराठी भाषिक नागरिकांच्या हक्कांसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षनिष्ठेपेक्षा जनतेच्या भावनांना प्राधान्य द्यावे आणि महापालिकेत ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन शेळके यांनी यावेळी केले.