Spread the love

*७व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे दिमाखात अनावरण*

बेळगाव ( प्रतिनिधी) दि.१६ मे : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनाचा ध्यास घेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ च्या निमंत्रण पत्रिकेचे आज मराठा मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात अनावरण करण्यात आले.*जेष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे या संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत*.

मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण तसेच शिवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. साहित्यप्रेमी, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती.

यावेळी बोलताना *आप्पासाहेब गुरव म्हणाले*, “मराठी साहित्य संमेलन ही केवळ साहित्यिक परंपरा नसून सांस्कृतिक ऊर्जा देणारी चळवळ आहे. मराठी भाषा आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला मराठा मंदिरचे सदैव पाठबळ राहील,” असे सांगत त्यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.

*परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील* यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मराठी भाषा, संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जागृत ठेवण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. सीमाभागात मराठीचा जागर घडविणारे हे संमेलन ठरणार आहे.”

*जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण* यांनी, “बेळगावच्या साहित्यिक परंपरेला नवे बळ देणारे आणि मराठी संस्कृतीचा उत्सव ठरणारे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरेल,” असे मत व्यक्त केले.

मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात केले .
यावेळी मराठा मंदिर संचालक चंद्रकांत गुंडकल व परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, एम. वाय. घाडी, मोहन अष्टेकर, संजय मोरे , संजय गौंडाडकर, मोहन पाटील व गणेश दड्डीकर तसेच महिला कार्यकारिणीतील नेत्रा मेणसे, सविता व्यसने, रोशनी हुंद्रे, संजीवनी खंडागळे, स्मिता मेंडके आणि गीता घाडी उपस्थित होत्या.

कार्यक्रमास पत्रकार श्रीकांत काकतीकर, उपेंद्र बाजीगर, सतीश जाधव , अनंत कुचेकर , संजय सुर्यवंशी आणि शिवाजी शिंदे यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित चौगुले यांनी केले.