बेळगाव : येथील सेंट पॉल्स हायस्कूल, कॅम्प येथे शुक्रवारी (१३ जून) आंतरगृह क्रीडा स्पर्धा तसेच सहशालेय उपक्रम क्लबच्या उद्घाटन समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात क्रीडा, संस्कार, नेतृत्व आणि गुणवंतांचा गौरव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव शहर शैक्षणिक क्षेत्राचे गट शिक्षणाधिकारी (BEO) रवी भजंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फा. एरिक मथायस एस.जे., उपमुख्याध्यापक फा. अलेन्द्रो डी’कोस्टा, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, क्रीडा शपथ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना क्रीडा आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे रवी भजंत्री म्हणाले, “क्रीडा विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, सांघिक भावना, नेतृत्वगुण आणि उत्कृष्टतेची जाणीव निर्माण करतात. शिक्षणासोबतच क्रीडा व सहशालेय उपक्रमांतील सहभाग विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला तो कंग्राळी खुर्द येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या श्रीश चव्हाणचा सत्कार. अवघ्या ३० सेकंदांत २७ कार्टव्हील्स (हातावरील उलट्या उड्या) मारून जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा विशेष गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते श्रीशचा सत्कार करण्यात आला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले.
यावेळी श्रीशच्या या उल्लेखनीय यशामागे त्याची आई अंजना चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे नमूद करण्यात आले. अत्यंत कमी वयात मुलाच्या अंगी असलेले कौशल्य ओळखून त्याला योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देत जागतिक विक्रमापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच श्रीशची आजी शोभा चव्हाण यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तीन पिढ्यांच्या पाठबळातून घडलेल्या या यशाबद्दल उपस्थितांनी चव्हाण कुटुंबाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

