Spread the love

जूनपासून 10 हजार अंगणवाड्यांत एलकेजी-यूकेजी वर्ग; कार्यकर्त्यांच्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने तोडगा
बंगळूर : राज्यातील अंगणवाडी व्यवस्थेत मोठा बदल करत येत्या जूनपासून 10 हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये एलकेजी व यूकेजी वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर टप्प्याटप्प्याने तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फ्रीडम पार्क येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 5 हजार अंगणवाड्यांमध्ये आधीच एलकेजी-यूकेजी वर्ग सुरू आहेत आणि हा उपक्रम पुढे विस्तारित केला जाणार आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री व शिक्षण विभागाशी समन्वय साधत पुढील निर्णय घेतला जाईल. उच्च शिक्षित महिला अंगणवाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने कार्यरत असल्याने अंगणवाड्यांमध्येच पूर्वप्राथमिक शिक्षण कायम ठेवण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूर्वी अंगणवाडी कार्यकर्त्यांना बीएलओ (मतदार नोंदणी) कामातून मुक्त करण्यात आले होते, मात्र पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या काळात त्यातूनही त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
“मी स्वतः महिला असल्याने कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेते. अनेक मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक तोडगा काढला जाईल,” असे सांगत त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.