बेळगाव :
पाटील मळा परिसरातील ड्रेनेजच्या कामासाठी १२ लाख मंजूर
प्रतिनिधी
बेळगाव प्रभाग क्र. १० मधील पाटील मळा येथे ड्रेनेजची समस्या गंभीर बनली होती. ती समस्या सोडवावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वारंवार केली. मात्र, निधीअभावी ते करणे शक्य झाले नाही. युजीडी फंडामधून अखेर १२ लाख रुपये मंजूर झाले आणि त्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
या प्रभागाच्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी यासाठी महापालिका आयुक्त तसेच विविध विभागांकडे पाठपुरावा केला
होता. पावसाळा तसेच इतर वेळी ड्रेनेज ब्लॉक होत होते. त्यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर या कामाला सुरुवात झाली. सिद्धार्थ भातकांडे आणि पंचमंडळींच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी मोहन धामणेकर, सुदर्शन चराटे, विनायक कांगले, प्रदीप उचगावकर, भाऊ पवार, स्वाती धामणेकर, दीपा पंवार, संजय भडगावे, ऋषिकेश चराटे यांच्यासह इतर उपस्थित होते. मुजावर गल्ली परिसरातही रस्त्यांचे डांबरीकरण तसेच गटारी बांधण्यात आल्या. त्यानंतर ड्रेनेजचीही समस्या सुटणार असल्याने वैशाली भातकांडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.