पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रक दुभाजकावरून पलीकडच्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या कॅण्टरला धडकल्याने घडलेल्या अपघातात दोन्ही चालकांसह 4 जण जखमी झाले असून यापैकी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अलारवाड ब्रिज जवळील कारच्या शोरूम समोर आज सकाळी 11 च्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बागेवाडीकडून बेळगावच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी ट्रक दुभाजकावर चढवून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर गेला आणि त्याने समोरून बेळगावहून बागेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कॅण्टर ट्रकला धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांच्या दर्शनीय भागाचा चक्काचूर झाला. त्यामुळे ट्रक व कॅन्टरच्या केबिनमध्ये चालकासह एकूण चौघेजण जखमी होऊन आतच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग पोलीस व बागेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले.
दरम्यान रुग्णवाहिकेलाही प्राचारण करण्यात आले. पोलीस तसेच जमलेल्या जमावापैकी काहींनी नासधूस झालेल्या ट्रक व कॅण्टरच्या केबिन मधून जखमींना महत्त्वयासाने बाहेर काढले. त्यानंतर त्यांची उपचारासाठी रुग्णवाहिकेतून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे रवानगी करण्यात आली.
अपघातात जखमी झालेल्यांपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सदर अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीस काही काळ अडथळा निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. बागेवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.