बेळगाव :
देसूर येतील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समिती व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने गेल्या दोन महिन्यापूर्वी मोठ्या उत्साहात बेळगाव येथून पंचधातू ने निर्मित श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचा आगमन सोहळा थाटामाटात पार पडला होता, आगमन सोहळ्या दिवशी देसूर गावात मूर्ति प्रत्येक गल्लीमध्ये मिरवणूक काढून एक आनंद उत्सव साजरा केला गेला होता. पण त्याच काही दिवसानंतर आचारसंहिता लागल्यामुळे प्राणप्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रम दोन महिने पुढे ढकलण्यात आला होता. हाच सुवर्ण दिवस उजाडला आहे , येत्या रविवार दि. 9 जून रोजी सकाळी 10:30 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पंचधातू मूर्ती प्रतिष्ठापना, दुग्धाभिषेक व लोकार्पण सोहळा, तसेच सोमवार दि. 10 जून रोजी दुपारी 2 वाजता महाप्रसाद व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजीराजे रोड, देसूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथे होणाऱ्या या भव्य सोहळ्यास उद्घाटक म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई उपस्थित राहणार आहेत. या पाहुण्यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना व दुग्धाभिषेक होण्यापूर्वी रविवारी सकाळी 8 वाजता गावामध्ये सौभाग्यवतींची संवाद कलश मिरवणूक निघणार आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता परिसरातील सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला मालार्पण करण्यात येईल. या समारंभास महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर, देसूर ग्रा. पं. अध्यक्ष लक्ष्मी शिवाजी पाटील, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी जि. प. सदस्य रमेश गोरल, श्रीराम सेना हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे बेळगाव जिल्हा प्रमुख किरण गावडे, कर्नाटक राज्य युवा काँग्रेस सचिव मृणाल हेब्बाळकर, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, देसूर पीडीओ सुचिता एस. बेनकनहळ्ळी, बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा नेते आर. एम. चौगुले, शुभम शेळके, धनंजय जाधव, मलगौडा पाटील आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. मूर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्याची सांगता रविवारी रात्री 8 वाजता आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानाने होणारा आहे.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना दुग्धाभिषेक व लोकार्पण सोहळ्यानिमित्त सोमवारी 10 जून रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतरसायंकाळी 7:30 वाजता विशेष सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते (तळबीड) यांचे वंशज जयाजीराजे बाजी मोहिते, सरसेनापती प्रतापराव गुज्जर (भोसरी) यांचे वंशज सयाजी राजे गुज्जर, शिवरायांचे बांधकाम मंत्री हिरोजी इंदोलकर (जेजुरी) यांचे वंशज संतोषदादा इंदोलकर, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक (सुपणे) यांचे वंशज दादासो नाईक, बाळूजी दुग्गल इनामदार (सदाशिवगड) यांचे वंशज रघुनाथराव दुग्गल इनामदार आणि शेलार मामा यांचे वंशज प्रकाश शेलार हे सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत. सत्कारानंतर रात्री 9 वाजता सांगलीचे शाहीर सम्राट देवानंद माळी यांचा पोवाडा कार्यक्रम होणार आहे.