बेळगाव:
100 रुपयांच्या 305 आणि 500 रुपयांच्या 6792 बनावट नोटा जप्त
गस्तीवर असणाऱ्या पोलिसांमुळे उघडकीस आला प्रकार
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांची पत्रकार परिषदेत माहिती आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी
गोकाक तालुक्यातील कडबगट्टी येथे बनावट नोटा बनवून त्या चलनात आणून दुप्पट करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन बेकायदेशीर कारवाईप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी सांगितले.
मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी ते बोलत होते. गोकाक-बेळगाव मार्गावरील कडबगट्टी गावातून जात असलेली एक कार पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अडवली, यादरम्यान हा प्रकार उघड झाला .
गोकाक तालुक्यातील कडबगट्टी रस्त्याने बेळगावकडे येणाऱ्या स्विफ्ट वाहनातून बनावट नोटांची वाहतूक करण्यात येत होती. या कारवाईत १०० रुपयांच्या ३०५ आणि ५०० रुपयांच्या ६७९२ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या कारवाईत अरभावी मधील अनवर महंमदसलीम यादवाड (२६), महालिंगपूर येथील सद्दाम मुसा यडहळ्ळी (२७), डुंडाप्पा महादेव ओनशेवी (२७), रवी चन्नाप्पा ह्यागाडी (२७), विठ्ठल हणमंत होसकोटी (२९) मल्लप्पा यल्लाप्पा कुंबाळी (२९) या आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान गोकाक, महालिंगपूर, मुधोळ, यरगट्टी, हिडकल धरण, बेळगाव, धारवाड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चलनी नोटांच्या बदल्यात बनावट नोटा वितरण केल्याची कबुली दिली आहे.
चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अरभावी गावातील अन्वर यादव यांच्या घरातून बनावट कागदपत्रे, संगणक, प्रिंटर आणि मोबाईल फोन आदी उपकरणे जप्त केली आहेत. उघड झालेल्या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले या प्रकारांच्या खोलवर तपासासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबत गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.