Spread the love

बेळगाव:

बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी अरभावी मतदार संघाचे आमदार आणि केएमएफचे संचालक भालचंद्र जारकीहोळी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटलावर टीकाटिप्पण्यांचे सत्र सुरु झाले असून विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपचे बेळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्यावर टीका केली आहे.या टीकेनंतर अरभावी मतदार संघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हेब्बाळकरांना प्रत्त्युत्तर दिले असून शेट्टर यांचा पत्ता विचारणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीनंतर पत्ता सापडेल, तोवर त्यांचा पत्ता सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानीच मिळेल, असे म्हटले आहे.

बेळगावमध्ये जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कि राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही हलक्यात घेऊ नये. अरभावी, गोकाक मतदार संघात अधिकाधिक मते मिळावीत यासाठी काँग्रेस मतयाचना करत आहे, हे स्वाभाविक आहे. राजकीय पातळीवरील चर्चा ठीक आहेत.
परंतु वैयक्तिक टीका करणे हे योग्य नाही. जगदीश शेट्टर यांनी गोकाक, अरभावी आदी ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळत आहे. येत्या ७ एप्रिल रोजी अरभावी येथे भाजपचे भव्य अधिवेशन घेण्यात येत असून यासाठीची सर्व तयारीही झाली असल्याचे जारकीहोळी म्हणाले.

चिकोडी मतदार संघातून प्रियांका जारकीहोळी या निवडणूक लढवत आहेत. याच मतदार संघात आपण देखील प्रचार करणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, माझा मतदार संघ बेळगाव लोकसभा आहे.

याठिकाणी आपण प्रचार करणार असून पक्षाने आपणास किंवा रमेश जारकीहोळी यांना प्रचारासाठी चिकोडीला पाठविले, तर आपण जाऊ शकू. या निवडणुकीत भाजप प्रचंड मतांच्या फरकाने विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.