बेळगाव:
बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद दिले जावे असे मत व्यक्त करून बीम्स आवारातील सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी दिली.
महिला व बालकल्याण खात्यातर्फे आज शनिवारी सकाळी आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे आमदार सेठ यांच्या हस्ते अंगणवाडी कार्यकर्त्यांचा सत्कार आणि त्यांना आयफोनचे वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघातील अंगणवाडी शिक्षकांना मोबाईल मेडिकल किट वितरित करण्यात आले त्यावेळी वरिष्ठ अंगणवाडी शिक्षकांचा सेठ यांनी गौरव देखील केला.
आमदार असिफ (राजू) सेठ म्हणाले की, बिम्स आवारातील बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. माझ्या वैयक्तिक जाहीरनाम्यात मी नेहमी शिक्षण व आरोग्याला पहिले प्राधान्य देत आलो आहे. या दोन गोष्टींवर मी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. परवाच मी मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा केली आहे.हॉस्पिटलची इमारत तर तयार झाली आहे, आता वैद्यकीय सामग्री, उपकरणांची ऑर्डर दिली जाईल. आज अंगणवाडी कार्यकर्त्यांना आम्ही स्मार्टफोन दिले आहेत. मुलांसाठी पुस्तके दिली असून मेडिकल किट देत आहोत. कर्नाटक सरकार आणि महिला व कुटुंब कल्याण खात्यातर्फे हे सर्व करण्यात आले आहे. यासाठी मी या खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना धन्यवाद देतो.
तसेच ऊन -पावसाची तमा न करता निष्ठेने आपले काम करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना देखील मी धन्यवाद देतो. कोरोना प्रादुर्भाव काळात या कार्यकर्त्यांनी बरेच कार्य केले आहे. आज-काल एका मुलाला सांभाळणं आई-वडिलांना कठीण जातं. त्या उलट या अंगणवाडी कार्यकर्त्या एकाच वेळी अनेक मुलांचा व्यवस्थित सांभाळ करतात हे अत्यंत प्रशंसनीय आहे. मला बहिणी व मुली समान असणाऱ्या या अंगणवाडी कार्यकर्त्यांना मी माझ्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांनी केंव्हाही माझ्याशी संपर्क साधावा, असे आमदारांनी पुढे सांगितले.
सध्या गाजत असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यासंदर्भात बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी हे गेल्या अनेक वर्षापासून तळमळीने धडाडीने समाज हितासाठी झटत आहेत. मागील वर्षी देखील त्यांना उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी मी केली होती. आता देखील माझी तीच मागणी असून बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद दिले गेले पाहिजे, असे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी स्पष्ट केले.