बेळगाव :
या गावातील युवकांना गावं सोडून रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ
कणकुंबी व इतर भागातील खेड्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार नागरिकाचा सवाल?
देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे होऊन गेली तरी खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना अध्यापि मूलभूत सुविधा न मिळाल्याने अद्याप ही नागरिकांना म्हणजे युवकांना गावं सोडून रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ आली आहे.या बाबतीत आमगाव म्हणजे विकासापासून लांब गाव असल्याने “आमगावचे युवक चालले लांब गावी” अशीच वेळ कणकुंबी भागातील आमगाव,मान,हुळंद, सडा आदी गावांच्या बाबतीतही आली आहे.
अद्याप या भागातील काही गावांना साधा रस्ता देखील नाही.वाहतुकीची कोणतीही सोय नाही, पावसाळ्यात दोन दोन तीन महिने विजेचा पत्ता नाही. अशा परिस्थितीत आदिवासी प्रमाणे जीवन जगणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच या भागातील प्रत्येक गावातील युवकवर्ग रोजगाराच्या निमित्ताने आपली गावे सोडून मोठमोठ्या शहरांच्या दिशेने चालले आहेत.
896b2b1d-c163-4938-a07c-fb932209e3d0
या भागातील विकासापासून अतिशय दुर्लक्षित राहिलेले गाव म्हणजे आमगाव.या गावाला अद्यापही साधा रस्ता नाही. वनखात्याच्या अडमुडया धोरणामुळे आमगावच्या लोकांना अजूनही हलाखीचे दिवस काढावे लागत आहेत.विकासामध्ये वारंवार खिळ घालून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या वनखात्याचा खेद व्यक्त करण्या पलीकडे काही होत नाही
ज्या गावाला दळणवळणाची सोय नाही अशा गावाचा विकास निश्चितच खुंटेला दिसतो. कुठलाही अधिकारी जाऊन पोचू शकत नाही. सरकारच्या सोयी सुविधा घेण्यासाठी लोकांची शहराकडे ये जा होत नाही. तसेच गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कुठल्याही सुविधा पोहोचत नसल्याने त्या भागातील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे.
सध्य स्थितीत या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली असून,साधी मोटार सायकल तर सोडाच पण चालून जाणे देखील मुश्किल होऊन बसले आहे.गेल्या पंधरा वीस दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मातीचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून बैलहोळ नाक्याजवळ (नदी) रस्त्यावर भल्या मोठ्या चरी पडल्या आहेत.गावातील आबालवृद्धांना अन्य गावांना जायचे झाल्यास या रस्त्यांवरून चालणं अवघड झाले आहे.पावसाळ्यात आमगाव गावच्या नागरिकांना बेळगाव खानापूर किंवा गोव्याला जायचे झाले तर नऊ ते दहा किलोमीटर घनदाट जंगलातून पायपीट करून जांबोटी कणकुंबी या मुख्य रस्त्याला यावे लागते.या शिवाय अन्य कोणताही पर्याय नाही.
आजपर्यंत आमगाव गावच्या नागरिकांना लोकप्रतिनिधी कडून आश्वासना पलीकडे काहीच मिळाले नाही.आपल्या नशिबालाच दोष देऊन उपजीविकेसाठी गावे सोडून मोठ्या शहरांकडे स्थलांतर होण्याची वेळ युवा वर्गावर आली आहे.त्यामुळे गावात फक्त पुरुष व महिला अशी वयस्कर मंडळी म्हणजे आजी आजोबा घरं सांभाळताना दिसतात.अशी परिस्थिती फक्त आमगाव या एका गावाची नसून कणकुंबी भागातील प्रत्येक खेड्यात हे चित्र पहायला मिळत आहे.कणकुंबी भागातील आमगाव व इतर खेड्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार हे येणारा काळच सांगेल.