बेळगाव:
येळूर मधील शेतकरी कृष्णा परशराम हुंदरे यांनी शेड मारण्यासाठी आणून ठेवण्यात आलेल्या पत्र्याच्या खाली साप दिसल्याने सर्पमित्र आनंद चिट्टी याना पाचारण केले. शेवटचा पत्रा काढल्यानंतर त्याखाली तब्बल चार साप दृष्टीस पडले. त्यापैकी दोन नाग सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी तर त्यांची पत्नी शिवानी चिट्टी व त्यांची सहकारी सुष्मिता नेसरकर यांनी प्रत्येकी एक धामण शिताफीने पकडला. हे चार साप चार ते सहा
वयाचे होते यापैकी दोन नाग नर व मादी तर दोन्ही धामण नर जातीचे होते.
नाग व धामण साप यांचा मिलन काळ असल्याने मादी ने सोडलेल्या गंध वासावर हे साप एकत्र आले. मात्र नाग व धामण यांच मिलन होत नाही. एकाच जातीच्या सापामध्ये समागम होतो. फेब्रुवारी महिन्या पासून साधारण मे पर्यंत मिलन काळ असल्याने नाग व धामण मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. नागरिकांनी सतर्क रहावे मात्र घाबरून जाऊ नये. असे सर्पमित्र चिट्टी यांनी आवाहन केले. यापुर्वी येळुर मध्येच महाराष्ट्र हायस्कूलच्या पाठीमागे चिट्टी यांनी तब्बल सहा साप एकाच ठिकाणी पकडले होते.