Spread the love

बेळगाव :

नैऋत्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांनी हुबळी येथे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे कामांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या अध्यक्षतेखाली नैऋत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत वाढवण्याची दीर्घकाळापासूनची मागणी हा बैठकीतील चर्चेचा मुख्य विषय होता.

यावेळी कडाडी यांनी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी वंदे भारत रेल्वेच्या विस्ताराचे महत्त्व सांगितले. त्यांनी कित्तूरमार्गे बेळगाव -धारवाड नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाच्या संथ गतीकडे लक्ष वेधले आणि सदर कामाला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय त्यांनी बेळगाव आणि मिरज दरम्यानच्या प्रवासी रेल्वे गाड्या पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू करण्याबरोबरच महाराष्ट्र आणि राजस्थानकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी खानापूर, घटप्रभा आणि रायबाग स्थानकांवर थांबे सुरू करण्याचे आवाहन केले.

बैठकीत राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बेळगाव जिल्ह्य़ाची महाराष्ट्र आणि गोव्याशी जवळीक लक्षात घेऊन सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी मुंबई, दिल्ली, तिरुपती, मंगळुरू, हैदराबाद, बिदर आणि सोलापूर यांसारख्या प्रमुख शहरांना जोडणारी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही मांडला.

बैठकीमध्ये फूट ओव्हरब्रिज, प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एस्केलेटरची स्थापना, देसूर येथे आणखी एक पिटलाइन सुरू करणे आणि इतर पायाभूत विकास याबाबतही चर्चा झाली.